मंगळवार, २९ जून, २०२१

परिवर्तन | लेखिका सौ. भारती सावंत

 

परिवर्तन


                     " ये आये  दे की खायला कायतरी " सकाळी  उठल्यापासून बाळ्या आईच्या  मागे  लागला होता. गरीब रूक्मी हतबल  झाली  होती. आज  घरात अन्नाचा  कणही  शिल्लक  नव्हता. काल रात्री  मालकीणबाईंना  हातापाया पडून पन्नास  रुपये  मागितले होते. पण  "रूक्मे तुझे  कामापेक्षा  नखरेच जास्त असतात. किती  उधाऱ्या  बाकी आहेत".

" उसने  म्हणून  नेतेस  नि  परत देण्याचे नाव  नाही" असे  बोलून  मालकीण बाईंनी हात  झटकला  होता. रूक्मी काकुळतीला येऊन  बोलत  होती," बाईसाहेब  समदे रुपये  मी  परत करीन, तुम्ही  सांगाल ते काम  करीन  पण  दोन  लेकरं भुकेली आहेत. घरात  अन्नाचा  कणही नाही". पोटात  अन्नाचा कण  नसल्याने  रूक्मीला ग्लानी  येत  होती  पण मालकीणबाई काहीतरी  मदत करतील या आशेने ती काम  करत होती. मात्र दगडाच्या काळजाच्या  मालकीणीला  पाझर फुटला नाही. घरात  विकण्यासारखे  काहीच रमेशने  शिल्लक  ठेवले  नव्हते. दारूपायी आता  बायकोच  विकायला उरली होती. बाकी  सगळे  विकले होते. रूक्मीला लेकरांची  उपासमार  बघवत नव्हती. त्यात  छोटा  संतोष  तापानेही फणफणला होता. बाळू  रडत  तरी  होता पण संतोष डोळेही  उघडू  शकत  नव्हता. आता रूक्मीही  थोडी चिडलीच. पण कोणावर चिडायचे  हे  तिला कळत नव्हते. दारुड्या नवऱ्यावर, उसने  पैसे न देणाऱ्या  मालकिणीवर, दैवावर की स्वतःवर!!...पण.. मनाचा  निर्धार करून ती उठलीच . संतोषला  कडेवर  घेतले, बाळूच्या  हाताला  धरले आणि तडक चालू लागली.  बाळूला  कळत नव्हते, "आई  आपल्याला घेऊन  कुठे चाललीय?"  तो ओढत असलेल्या आईच्या  मागून पळत  होता .शेवटी रूक्मी  एका  ठिकाणी  थांबली तिथून अनेक  वाहने  जात होती. आता ती प्रत्येक  गाडी जवळ  जाऊन  हात पसरू लागली. गाडीत  बसलेल्यांना  तिचे दुःख कसे  कळणार ! ते  तिला  दूर हटवत होते, नि  गाडी  पळवत  होते. एखादा गाडीवाला  थोडीशी  काच उघडून रुपया दोन  रुपये  हातावर टेकवत होता. 

              इतक्यात  एक  पॉश  गाडी जवळ  येऊन थांबली. क्षणभर ती घाबरली. तिला  गाडीवाल्याचा  थोडा रागही  आला. कारण  गाडी  थोडी  पुढे आली असती  तर  तिघेही  गाडीखाली चिरडून  मेले असते. असे तिला वाटले. एक  गॉगल  नि  कोट घातलेली  व्यक्ती गाडीतून उतरली  आणि  रूक्मीशी मोठ्या  अदबीने  बोलू लागली."ए  रूक्मी, तू  रूक्मीच  ना? मी  उस्मानभाई . गेल्या  वर्षी माझ्या घरी तू  काम  करत  होतीस पण अचानक आम्ही दूबईला  शिफ्ट झालो  नि तुझा संपर्क सुटला"." गेल्याच  महिन्यात  मी पुन्हा परत  आलोय  पण  तेव्हापासून  तुला शोधतो  आहे. तू  कुठे राहतेस?".आता  रूक्मीला  सगळ्या  गोष्टींचा उलगडा  झाला. गेल्या  वर्षी  मालदार अशा उस्मानभाईंच्या  बंगल्यात ती काम करत होती.अचानक  त्यांचा  मुलगा तापाने फणफणला. घरी  कोणीच नव्हते.रूक्मीने आपले  डोरले  देवून पैसे आणले  नि  मुलाला  डॉक्टरकडे नेले. घरी आल्यावर उस्मानभाईंना  हा प्रकार कळला  तेव्हा त्यांच्या  मनाला चाटून गेले. आज रूक्मी नसती तर त्यांचा मुलगा वाचला नसता . परंतू  त्यांना अचानक  दूबईला जावे  लागल्याने ते तिच्यासाठी  काहीच  करू शकले नव्हते. पण  परत आल्यापासुन ते  वेड्यासारखे तिला  शोधत  होते.आता  ती त्यांना दिसली होती. त्यांनी  तिला आणि तिच्या मुलांना  गाडीत  घातले  नि  एका शानदार  हॉटेलात  घेवून गेले. तिघांना पोटभरून जेवू घातले. एका  तासापूर्वी एक दोन  रूपयांसाठी  तोंड पसरणारी रूक्मी  शानदार  हॉटेलात पंचपक्वान खात  होती.

               जेवल्यावर  उस्मानभाई त्यांना घेऊन  कपड्यांच्या दुकानात घेऊन गेले. कपड्यांचे  दोन  दोन जोड  घेऊन ते सरळ  घरी  घेऊन  गेले. तिचा आपल्या डोळ्यांवर  विश्वास  बसत नव्हता.ती पुन्हा पुन्हा  स्वतःला  चिमटा  काढुन बघत होती. तृप्तीचा  ढेकर देताच उस्मानभाईंनी  तिची सारी  व्यथा  विचारपूस  करून जाणून घेतली. तिघांना  तसेच  गाडीत घालुन ते आपल्या  घराकडे निघाले. एका आलिशान  बंगल्यासमोर  गाडी  उभी  राहताच  भाई  स्वतः  गाडीचे  दार उघडायला आले. सुलताना  भाभी  सर्वांना बघुन  दाराकडे  धावल्या  नि  त्यांनी रूक्मीच्या  पायांवर  चक्क  लोटांगण घातले. अश्रुंनी  तिच्या पावलांवर  अभिषेक  केला. तिला आत  नेवून  सुंदर साडी  नेसायला  दिली. मुलांना  नवे  कपडे घालायला  सांगितले. संतोषला  जेवण  मिळाल्याने  त्याचा तापही  उतरला  होता. बाळ्या  मात्र  न समजून  कुतूहलाने  इकडेतिकडे  पहात होता. रूक्मी  सैरभैर  झाली  होती.

                     हे  सर्व काय  होत आहे हे तिच्या आकलनक्षमतेच्या बाहेर होते. तिचे डोळे  मात्र  पाझरताना थांबतच नव्हते.


 सौ.भारती दिलीप सावंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवगीत स्वातंत्र्याचे

 नवगीत स्वातंत्र्याचे चिरतरुण स्वातंत्र्याचे  | नवगीत गाऊया सारे  नव्या जगाचे नव्या युगाचे | घुमूदे नव्याने वारे    |धृ| गरीब श्रीमंत भेद नक...