मन चंचल
मन चंचल जाणावे | त्वरे घालावी वेसण
मार्ग दावावा नेटका | तयासाठी
कधी पुरवावे लाड | कधी दाखवावा धाक
बळे सोडुनि न द्यावा | वळू परि
मन निर्मळ झऱ्याचे | त्याला खोली सागराची
आभाळाची उंची त्यास | जाण तूचि
मन लोण्याहूनि मऊ | कधी वज्रासवे टणक
भावनांचा त्यास धाक | सुखदुःखा माजी
मन बासरीची धून | पैंजनांची रुणझुण
मन मनाचे माहेर | माहेरवासा
मन अधीर अधीर | त्यात आठवांचा ठेवा
मना आधारच हवा | आपुलाची
©कवी- विवेक शेळके

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा