जगाचा पोशिंदा
कवी -विवेक शेळके
जगाचा पोशिंदा
आसवं डोळ्यात ,
तरी झुकला ना खांदा
केलं रगताचं पाणी,
शिवार शिपलं
झाला निसर्गाचा घाला,
एका क्षणात संपलं
केली होती निगराणी,
जिवाच्या पल्याड
तो रात्रंदिन जागलेला,
जग झोपलेलं गाढ
आस उराशी एकच,
खळगी पोटाची भरेल
जग पोसून, दोन घास
लेकरांनाही उरेल
कावा निसर्गाने केला,
सारं विस्कटून गेलं
पीक हाताशी आलेलं
ओल्या मातीत निजलं
ओंजळ रिकामी झालेली
गेली आसवे भरून
कोपला निसर्ग,
जग पाहते दुरून
तरी हरणार नाही
उभा राहील एकदा
वचनाचा आहे पक्का
हा जगाचा पोशिंदा !!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा