पारिजात
लेखक -विवेक शेळके
[भाग १ ]
बस स्थानकावर गर्दी पाहून राजेश रिक्षे मध्ये बसला. आज तरी ऑफिसला उशीर व्हायला नको.आज खूप महत्वाच प्रेझेंटेशन द्यायचं आहे . हा एकच विचार त्याच्या मनात सारखा घोळत होता. सादर करावयाच्या साऱ्या बाबी त्याने पुन्हा एकवार मनात जोडून पहिल्या .सगळ्या वस्तू आहेत ना याची खात्री करून घेतली आणि तो थोडा निवांत बसला.
"साहेब , तुमच ऑफिस आलं". रिक्षा वाल्याने आवाज दिला . राजेश खाडकन जागा झाला. रिक्षावाल्याचे पैसे देवून धावतच तो ऑफिस मध्ये शिरला . एका प्रशस्त इमारतीत त्याच ऑफिस होत.दोन वर्षापूर्वी कॉम्पुटर इंजिनियर म्हणून त्याची नेमणूक झाली होती . आणि आज बरोबर दोन वर्षांनी त्याला नव्या प्रोजेक्ट साठी प्रेझेटेशन द्यायचे होते.तसा बॉस चा हुकूमच आला होता म्हणा.
राजेश साहेब तुम्हाला साहेबांनी बोलावलंय , शिपायाने निरोप दिला.
आज पुन्हा ओरडा खावा लागणार बहुतेक राजेश मनातच म्हणाला . आणि तो बॉस च्या केबिन कडे निघाला .
केबिन च्या बाहेरूनच त्याने आतला अंदाज घ्यायच ठरवलं आणि तो क्षणभर दरवाज्याजवळ रेंगाळला.
अरेच्च्या चक्क हसण्याचा आवाज असा विचार करत त्याने दरवाज्यावर नॉक केल. 'मे आय कम इन सर '.राजेश ने दरवाजा उघडत विचारले आणि क्षणभर त्याचे डोळे बॉसच्या खुर्चीवर खिळून राहिले .एक सुंदर तरुणी आपल्या बॉसच्या खुर्चीवर बसलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले.
अरे ये राजेश ये . बॉस ने हसतच त्याच स्वागत केलं.
बॉस चा आवाज ऐकून राजेश भानावर आला. डेस्क जवळ जावून उभा राहिला .
बसा ना .! त्या तरुणीने मधुर आवाजात त्याला बसायला सांगितले तेव्हा तो अडखळतच खुर्चीत बसला .
कोण बर ही ,या आधी ऑफिस मध्ये पाहिल्याच आठवत नाही आणि ही बसलीय बॉस च्या खुर्चीत .राजेश विचारात गढून गेला होता.
राजेश , ही शलाका .माझी मुलगी .नुकतीच एम बी ए झालीय .आणि आज पासून या ऑफिसच काम ही सांभाळणार आहे .
अभिनंदन मिस.!! राजेश ने शुभेच्छा दिल्या .
शलाका ! शलाका माझ नाव . मिस वगेरे म्हणू नका. मला माझ्या नावानेच हाक मारायची .
हो मिस . सॉरी शलाका .
आणि ऑफिस मध्ये हास्याची लकेर उमटली .
------------------------------------------------------------------
[भाग २]
अर्ध्या तासाने प्रेझेंटेशन द्यायचे आहे म्हणून राजेश ने त्या दोघांचा निरोप घेतला आणि तो त्याच्या केबिन मध्ये आला. नवी बॉस पाहून राजेश चे चित्त थाऱ्यावर नव्हते .शलाकाचा चेहरा आठवतच त्याने प्रेझेंटेशन ची तयारी केली . कॉन्फरन्स रूम मध्ये जावून तयारी करणे आवश्यक होते म्हणून तो तिकडे निघाला . सर्व जमल्यानंतर मिटिंग सुरु झाली . एका सराईत प्रेझेंटेटर प्रमाणे राजेश ने प्रेझेंटेशन दिले .
शलाकाच लक्ष आपल्या बोलण्याकडे आहे हे राजेश ने हेरले होते . राजेश च्या सादरीकरणावर ती भलतीच खुश झाली होती . प्रेझेंटेशन संपल्यावर तिने सर्वात आधी टाळ्या वाजवून राजेशचे अभिनंदन केले.
हूश्श ,झाल प्रेझेंटेशन. या अविर्भावात राजेश आपल्या केबिन कडे जायला निघाला .
‘राजेश ...., पाठीमागून आवाज आला म्हणून राजेश ने वळून पहिले .शलाका पाठीमागून आवाज देत होती.
अभिनंदन , शलाकाने त्याचा हात हातात घेत कौतुक केल.
धन्यवाद ..राजेशने आपला हात सोडवत तीच अभिनंदन स्वीकारलं . आणि तो आपल्या केबिन कडे निघून गेला .
राजेशचे काम सर्वांनाच आवडत होते .आणि आता तर त्याचे काम आवडणाऱ्या मध्ये अजून एका व्यक्तीची भर पडली होती .शलाका .
शलाका वर्णाने गोरी ,सडसडीत बांधा,आणि सुस्वभावी मुलगी .बापाची एकुलती एक म्हणून लाडात वाढली होती पण कधीच श्रीमंतीचा गर्व केला नाही. एम बी ए झाली आणि पापांनी लगेच ऑफिस जॉईन कर अस सांगितलं आणि ही दुसऱ्याच दिवशी हजर झाली. पाहिल्या दिवशीच राजेशशी ओळख झाली याचा तिला खूप आनंद झाला. एका चांगल्या व्यक्तीशी ओळख झाली याचा तिला सार्थ अभिमान होता .
पण आपण राजेश च अभिनंदन केल तेव्हा त्याने आपल्या हातातून स्वताचा हात असा लगेच सोडवून का घेतला याच तिला नवल वाटलं होत . कुठल्याही मुलाला एखाद्या मुलीने स्वताहून आपला हात हातात घ्यावा असे वाटत असते आणि हा तर वेगळाच निघाला . एका मुलीने अर्थात आपल्या बॉस ने आपल हातात हात घेऊन अभिनंदन केल आणि ह्याने हात सोडवून घेतला .
‘कठीण आहे’ .शलाका मनातच म्हणाली होती .
शलाकाला काय वाटलं असेल , आपण असं हात लगेच सोडवून घेतला ... राजेशच्या डोक्यातही तेच विचार चालले होते .रात्री झोपताना ही तो आजच्या दिवसाचाच विचार करत होता..
मोबाईल मध्ये मेसेज आला .नंबर अनोळखी होता .ओपन करताच त्याच्या डोळ्यांमध्ये चमक आली . ‘गुड नाईट’ आणि खाली नाव होत ‘शलाका’
राजेश हातामध्ये मोबाईल घेऊन बराच वेळ विचार करत होता .रिप्लाय करावा कि नाही या विचारातच त्याला केव्हा झोप लागली हे कळलेच नाही ....
-----------------------------------------------------------
[भाग 3]
कधी नव्हे ते आज राजेश सकाळी लवकर उठुन ऑफिसला जायला निघाला. तयार व्हायला आज थोडा जास्त वेळ लागला हे त्याच्याही लक्षात आले. गालातल्या गालात हसत त्याने कामाला सुरुवात केली.
शलाका आली असेल का असा विचार मनात आला आणि शिपायाने निरोप आणला.
' मे आय कम इन , आत डोकावत त्याने विचारले.
'या' . तिने मान वर न करताच म्हटले.
'काल तुम्ही रिप्लाय केला नाही'.
कसला ? आपल्याला कळले नाही असे दाखवत तो म्हणाला.
शलाकाच्या कपाळावर नाराजीची एक आठी उमटून गेली.
काही न बोलताच राजेश केबिन मध्ये निघून आला. अस का वागला असेल तो. या विचारात तिने काहीच काम केले नाही.
अरे , पण मला हे काय होतंय. मी इतकी नाराज का झाले त्याच्यावर. ओळख होऊन फक्त दोन दिवस झाले तरी अस बेचैन का झाले मी.
शलाका अस्वस्थपणे फेर्या मारत होती. काहीच का बोलला नाही राजेश. विचार करून तिचे डोके दुखायला लागले.
केबिन मध्ये राजेश शांतपणे काम करत होता. पण डोळे होते बाॅस च्या केबिन कडे.
आपण तिच्याशी असे रूडली वागायला नको होते. साॅरी म्हणावे का तिला. नाही आता नको. त्याच्या मनाची घालमेल होत होती.
त्याच विचारात तो घरी आला.
शलाका डोक दुखत म्हणून आपल्या बेडरूममधे जाऊन बसली . खरतर ती अजूनही त्याच विचारात होती.
तिने मनाशी काहीतरी ठरवले आणि शांतपणे झोपून गेली.
पुढच्या एक आठवडा ती ऑफिसला गेली नाही. राजेशचे कामात लक्ष नव्हते .आपल्यामुळे तिला वाईट वाटले असेल. त्याने तिला साॅरी म्हणायचे ठरवले. त्याने फोन लावला.
हाय , मी राजेश बोलतोय.
हा बोला. तिने थोड नाराजीतच उत्तर दिले.
'रागावलात ना'.
नाही, मी का रागावू.
'त्या दिवशी रिप्लाय नाही केला म्हणून. '
'अस काही नाही'. तिने झटक्यात उत्तर दिले.
बरं. राजेश शांतपणे म्हणाला. ठेऊ का फोन.
ऐका ना, तिने हळूच आवाज दिला.
बोला ना . त्याने ही खट्याळपणे विचारले.
'आज येते मी ऑफिसला'. ती लाडीक पणे म्हणाली.
या . वाट पाहतोय.
------------------------------------------------------------
[भाग 4]
शलाका आणि राजेश खूप वेळ गप्पा मारत बसले होते. त्यांच्या गप्पा ऐकून कोणी सांगितले नसते की यांच काही बिनसलं होत.
पूर्ण दिवसभर राजेश बाॅस च्या केबिन मधून बाहेर पडला नाही.
एका सुंदर नात्याची सुंदर सुरुवात झाली होती. रोज ऑफिसला वेळेत येणे, काम करणे असा दिनक्रम सुरू झाला. कधी फोनवर बोलणे,कधी दिवसभर चॅटिंग, तर कधी एखाद्यी फाईल घेऊन बाॅस च्या केबिन मध्ये जाण किंवा बोलावणं सुरू झालं. परंतु या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांनी त्यांच्या कामावर होऊ दिला नाही.
एका संध्याकाळी घरी जाताना शलाकाने राजेशला थांबायला सांगितले.
'आज आपण माझ्या गाडीने जाऊया '.
'ओहो आज काही विशेष'. राजेशने हसत हसत विचारले.
काही नाही वो ,सहजच.
बरं चल. राजेश गाडीत बसत म्हणाला.
खूप छान गाडी चालवते तू. राजेशने तिच कौतुक केले.
गालातच हसत शलाकाने गाडी एका पंचतारांकित हाॅटेल समोर थांबवली.
' इथे का थांबलोय आपण'. राजेशने थोड नाराजीतच विचारले.
काॅफी घेऊयात, प्लीऽऽज .!! तिने बालीशपणे म्हटले.
ठीक आहे. राजेश शांतपणे म्हणाला.
तिने तिच्या पसंतीची कोल्ड कॉफी ऑर्डर केली.
तुम्ही काय घेणार ? तिचा हळुवार प्रश्न आला.
'काहीही चालेल. तुझ्या आवडीचं'. तिच्याकडे पाहात त्याने सांगितले.
'हो काय. बरं'. ती खट्याळ हसली.
----------------------------------------------------------
[भाग 5]
एकमेकांना समजून घेतलं तरच नात्याची सुंदर विण विणली जाते.
राजेश आणि शलाकाच नातं असच फुलत होतं. एकमेकांशिवाय करमेनासं झाल होतं. फोन, चॅटिंग, फिरणे सुरू होते. पण दोघांनाही आपल्यात काय नाते आहे ते कळत नव्हतं.
प्रेमाची चाहूल दोघांनाही लागली होती. पण दोघांपैकी कुणीही मान्य करत नव्हते. एव्हाना यांच्या प्रेमाची कल्पना स्टाफला आली होती. जोडा शोभत होता.
एके दिवशी तो न सांगता रजेवर राहिला. रजेवर राहण्याचे कारण होते वैयक्तिक कामानिमित्त. शलाकाला वाटले त्याने मुद्दाम आपल्याला कारण सांगितले नाही. म्हणून ती त्याच्यावर नाराज झाली. ती नाराज होती खरी, पण मनातून तिला राजेशची काळजी वाटत होती.
दिवसभराचे काम आटपून संध्याकाळी तिने त्याला फोन केला.
'अहो, कोठे आहात तुम्ही. तब्येत बिघडली आहे का ? काय झालं आहे? डाॅक्टर कडे गेला होतात का ? बरं मला सांगा औषधे घेतली का ?
प्रश्न विचारून तिने त्याला भंडावून सोडले.
अग हो हो जरा उसंत घे. किती प्रश्न विचारशील ? मला बोलू तर दे.
'हा बर बोला'. तिने परवानगी दिल्याच्या आविर्भावात म्हटले.
'मला माझ्या रूममध्ये साफसफाई करायची होती म्हणून मी रजेवर गेलो होतो'. यात सांगण्यासारखं काय आहे'. त्याने सांगितले.
' अहो , पण यात न सांगण्यासारखे पण काही आहे का ? तिचा उलट प्रश्न आला.
'बरं बाबा चुकल माझं '
बाबा काय म्हणता मला. ती म्हणाली.
'बरं बाई चूक झाली'. राजेशने चिडवत म्हटले.
ईईईईई. .. बाई नाही ना..... शलाका. शलाका म्हणा.
जवळ जवळ दोन तास ते फोनवर बोलत होते. दिवसभरात ऑफिसमध्ये घडलेल्या कामांचे इतिवृत्त तिने त्याला दिले.
'किती काम करते तू? थकली नाहीस का? जा बरं फ्रेश हो'. राजेशने प्रेमाने सांगितले. तशी ती फूलपाखराप्रमाणे बागडत पळाली. तिला खूप खूप आनंद झाला होता.
-----------------------------------------------------------
[भाग 6]
सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने शलाकाने ऑफिसला जायला कंटाळा केला. अर्जंट काम असेल तर फाईल घरी पाठवून द्या असा निरोप तिने ऑफिसमध्ये दिला.
तिने राजेशला फोन केला. हॅलो, कोठे आहात ?
'हा काय पोहोचतो आहे ऑफिसला'.
ऐका ना!
बोला ना! त्याने चिडवत म्हटले .
'आता घरी याल माझ्या'. तिने विचारले.
आत्ता ? का ? कशासाठी ? आणि घरी कोण आहे?
'कोणी नाही'. पप्पा टूरवर गेलेत आणि मम्मी बाहेर गेलीय.
मग नको. सर आले की येईन मी.
'वाटलच होतं , नाही म्हणाल ते. अहो पप्पा आहेत घरी . आतातरी येताय ना'. तिने थोड चाचरत विचारले.
'हो. येतो. राजेश थोडा विचार करत म्हणाला.
अर्ध्या तासात राजेश शलाकाच्या घरी पोहोचला. बेल वाजवली तर शलाकाने दरवाजा उघडला.
'वेलकम इन माय हाऊस'. आपलं स्वागत आहे सर. ती हसत हसत म्हणाली.
आत पाऊल टाकतच त्याने विचारले,
'सर कोठे आहेत' ?
'अहो , बसा तर आधी. मी पाणी आणते'. ती किचनमधे जात म्हणाली.
'म्हणजे तू खोटे सांगितले मला की सर आहेत असं'? त्याने रागाने बघत विचारले.
'खर सांगून पाहिले ,तर तूम्ही नाही म्हणालात यायला मग काय करणार न . म्हणून थोड खोट बोलले'.
राजेश रागातच बाहेर जायला निघाला. तशी शलाकाने त्याची वाट अडवली.
'इतके का रागावता' नका ना जावू.
शलाकाने राजेशला मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. हुंदका आला होता तो तिने कसा बसा आवरला. त्याने तिला बाजूला केले. ती केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती.
'हे योग्य नाही , मला जायला हवे. साॅरी . राजेश वायूवेगाने बाहेर पडला.
शलाका सोफ्यावर बसली. झाल्या प्रकाराने तिला खूप भरून आले. ती ओक्साबोक्सी रडू लागली.
----------------------------------------------------------
[भाग 7]
एक वादळ यावं आणि क्षणात सारं होत्याचं नव्हत व्हावं. असच काहीसं झालं राजेश आणि शलाकाच्या आयुष्यात. तो दिवस त्यांच्या नात्यामधे दुरावा निर्माण करणारा ठरला. राजेशने तिच्याशी बोलणे तोडले. ऑफिसला येण्याची व जाण्याची वेळ बदलली. तो दिलेली कामे पूर्ण करून निघून जावू लागला. ती समोर आली तर हा रस्ता बदलत असे. बाॅस च्या केबिन मध्ये जाण असलं तर तो सोबतीला एखाद्याला नेत असे त्यामुळे तिला काहीच बोलता येत नव्हते.
त्या दिवसापासून ह्याने मोबाईल बंद करून ठेवला होता. तिने खूप फोन करून पाहिले, मॅसेज केले पण काही फायदा झाला नाही. दिवस असेच जात होते. ऑफिसमध्ये इतर लोकांना दोघांचे बिनसलं आहे हे कळत होते. काय झालं ते मात्र कुणालाच ठाऊक नव्हते.
एके दिवशी ती न राहवून राजेशच्या केबिन मध्ये आली.
'काही काम होतं का '? त्याने तिच्याकडे न पाहताच विचारले.
' हो', थोडं महत्वाचे बोलायचे आहे. तिच्या आवाजात कंप होता.
'बोला ना. त्याने सांगितले.
'नाही , इथे नको. बाहेर जावूयात का?
'नाही, जे असेल ते इथे बोला.
साॅरी~ तिचा आवाज जड झाला. मला माहिती आहे मी अस करायला नको होते. पण मी फक्त आपल्याला एकांतात बोलता येईल म्हणून खोट सांगितले तुम्हाला. मला हवी ती शिक्षा द्या पण असं रागावू नका.
तो फक्त ऐकत होता.
आजवर मी माझ्या मम्मी पप्पांशिवाय दुसर्या कोणाला इतका जीव लावला नाही. पण खरं सांगते, आपल्या पहिल्या भेटीतच तुम्ही मला आवडलात.
त्याने तिच्याकडे पाहिले. ती त्याच्याकडेच पाहत होती. नजरानजर होताच त्याने मान वळवली. तिला वाईट वाटले.
ती बोलू लागली. ........
----------------------------------------------------------
[भाग 8]
बोलली खोटे मी पण , का बोलली असेन याचा विचार केलात का ? मला तुमचा सहवास आवडतो , मला तूम्ही आवडता म्हणून. आणि काय असा गुन्हा केला मी, की तुम्ही बोलण तोडलत माझाशी ?
'मी इतकी वाईट आहे का ? सांगा ना.' तिच्या रडण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तो फक्त तिच ऐकून घेत होता .
'तुमची सोबत मिळावी इतकी छोटी इच्छा मनात होती आणि त्यासाठीच मी हे सार केले. '
तिने भडाभडा आपल मन मोकळं केलं आणि हुंदके देत सोफ्यावर बसली. राजेशला आपण बरोबर वागतोय की चूक काहीच कळत नव्हते. तो ऑफिसमधून लवकर निघाला.
दुसर्या दिवशी त्याने त्याचा राजीनामा दिला.
त्याच्या या निर्णयाने शलाकाला मोठा धक्का बसला.
ती ऑफिसला जायची पण मन मात्र राजेश कडे धाव घेत होते. ही गोष्ट तिच्या पप्पांशिवाय सर्वाना माहिती होती. तिच्या कामात चुका होऊ लागल्या तशी तिने पप्पांना सांगून एका आठवड्याची सुट्टी घेतली.
अधून मधून ती राजेशचा फोन ट्राय करून बघत असे.
इकडे राजेश रूमवर एकटाच बसून असायचा. ना झोप ,ना धड जेवन. काय करावं ? दुसरा जाॅब शोधावा लागणार आहे.
त्याने नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली, पण त्याला मनासारखं काम मिळत नव्हते.
शलाका पासून दूर जाण्यासाठी त्याने जाॅब सोडला , पण आता त्याच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.
राजेशने तिची मैत्री नाकारली नव्हती, नाकारले होते ते प्रेम. . . . .
-----------------------------------------------------------
[भाग 9]
पाऊस मी म्हणत होता. सगळीकडे अंधारून आले होते. राजेश घरीच होता. दरवाजावर टकटक वाजले. अशा पावसात कोण बरं आले असेल. त्याने अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. छे! दरवाजा उघडून तर बघूया म्हणत तो दरवाजा जवळ गेला. शलाका तर नसेल ? क्षणभर थांबून विचार करू लागला. नाही ती कशी येणार इकडे. तिला कुठे ठाऊक आहे माझे घर. मग कोण असेल असा विचार करत त्याने दरवाजा उघडला.
सर, तुम्ही ?
हो. मीच.
या ना सर आत या. बसा मी पाणी आणतो.
त्याने पाणी आणले. पाणी पिताना सर आपली रूम निरखून पाहत आहेत हे त्याच्या लक्षात आले.
छान आहे रे तुझी रूम.
थॅंक्स.
अरे खरंच. सगळ्या वस्तू कशा जागच्या जागी आहेत. एकटा राहतोस अस वाटतच नाही.
त्याच काय आहे सर, मला नीटनेटकेपणा आवडतो. आणि आपलच घर स्वच्छ ठेवण्यात कसली लाज.
हो बरोबर आहे तुझं.
राजेश सरांशी खूप वेळ गप्पा मारत बसला पण अजूनही त्याच्या मनात सर इथे अचानक कसे काय आले हा प्रश्न होताच. त्याने थोडं चाचरत त्यांना विचारले.
'सर, आज तूम्ही माझ्या रूमवर आलात. मला खूप आनंद झाला'.
'मला ही छान वाटलं तुला भेटून'.
'पण सर आज अचानक '?
'वाटलं एकदा भेटायला हवं मग आलो. तू तर न सांगता जाॅब सोडलास. मग विचार केला चला आपणच जाऊ भेटायला'.
'सर, कामात मन लागत नव्हते. अन मग उगाच चुका होण्यापेक्षा काम सोडलेल बरं म्हणून सोडला मी जाॅब'.
'कामात लक्ष लागत नव्हते म्हणून की शलाकाने तिच प्रेम तुझ्याकडे व्यक्त केले म्हणून '?
राजेशला आश्चर्याचा धक्का बसला. काही क्षण तो त्यांच्या कडे पाहत राहिला.
'असा काय पाहतोस, मला हे कसं कळलं याचाच विचार करत आहेस ना ? अरे तिचा बाप आणि तूझा बाॅस आहे मी.
सगळीकडे लक्ष होतं माझं. मला शलाकाच्या चेहर्यावर आनंद दिसत होता, जेव्हा तुम्ही दोघे सोबत होतात. तुमची केमिस्ट्री छान जुळते आहे अस वाटून मी ही निश्चिंत झालो होतो.
पण तुम्ही आजकालच्या जनरेशनने नात्यांमधे सिरीयसनेस कुठे ठेवलाय ?
'का सोडून आलास तिला' ?
'सर . . . ते. ...
'बोल ना. '
सर, तुम्ही माझे बाॅस आहात आणि ती तुमची मुलगी. मला तुमच्या प्रतिष्ठेला धक्का नाही लावायचा . मलाही शलाका आवडली , अगदी पहिल्या भेटीतच. पण तिला माझ्यात गुंतताना पाहून मला वास्तव विसरून चालणार नव्हतं.
' हे बघ राजेश , मुळातच मला गरीब श्रीमंत असा भेद मान्य नाही. जिथं प्रेम आहे तिथे बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात . मी जिद्दीने कार्य करणाऱ्या माणसांची कदर करतो. आणि तुझ्यासारख्या होतकरू तरूणाला मी माझी मुलगी सोपवणे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
'पण सर '
'आता पण नाही आणि बिन नाही,तू उद्या ऑफिसला येणार आहेस, मी वाट पाहीन. अर्थात शलाकाही..
----------------------------------------------------------
[भाग १०] ( शेवट )
बॉस निघून गेल्यावर राजेश बराच वेळ विचार करत होता.
काय योग्य, काय अयोग्य या द्वंद्वात तो केव्हा झोपला त्यालाच कळलं नाही.
आज नेहमीप्रमाणे राजेश सकाळी लवकर उठला. का कुणास ठाऊक पण ऑफिस ला वेळेवर जायची घाई नव्हती तरी लवकर निघावं अस तो मनाशीच म्हणाला. साध्या कपड्यांमध्येही तो रुबाबदार दिसत होता , नेहमी प्रमाणे!
घरातून निघताना देवाला नमस्कार करायला तो विसरला नाही. ऑफिस साठी रिक्षा पकडून निघाला आणि त्याची विचारचक्रे पुन्हा सुरू झाली.
शलाकाचा चेहरा पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. खूप दिवस तिला पाहिलं नव्हतं की फोन वर बोललेही नव्हते ते दोघं. पूर्ण अबोला होता आणि आज तर ऑफिस मध्येच भेटायचं आहे .तो पुन्हा उदास झाला , काय सांगायचं तिला , तिच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची , मुळात ती आपल्याशी काय बोलेल याचाच तो विचार करत होता. तिचं आणि आपलं आयुष्य एका धाग्यात विणलं जाणं शक्य आहे का ? सुखाचा संसार , योग्य जोडीदार असा शब्दांचा खेळ त्याच्या मनात सुरू होता.
'साहेब , तुमचं ठिकाण आलं'.
रिक्षावाल्याने राजेश ला आवाज दिला तसा तो भानावर आला.
रिक्षावाल्याचे भाडे देऊन तो ऑफिसच्या इमारतीकडे पाहू लागला. याच ठिकाणी त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती . ऑफिस मध्ये पाय ठेवताच सिक्यूरिटीने कडकडीत सलाम ठोकला. राजेश थोडा गोंधळला . एक वेगळंच वातावरण तयार झालेलं त्याला दिसलं.
सर्वांनी त्याच हसून स्वागत केलं. काही नवीन चेहरे त्याला दिसत होते. तेवढ्यात त्याचे बॉस बाहेर आले आणि राजेश ला मिठी मारली .
'मला ठाऊक होतं तू नक्की येशील'. माझा मान राखलास.
'सर, तुम्ही माझे गुरू आहात. मी तुम्हाला त्रास होईल असं कधीच वागणार नाही.' राजेश म्हणाला.
राजेशची नजर आजूबाजूला फिरत होती, कुणाच्यातरी तरी शोधात.
'ती तुझी केबिन मध्ये वाट पाहतेय.'
बॉस ने त्याच्या शोधक नजरेच उत्तर त्याला दिलं.
तो गोंधळला , पण स्वतःला सावरत त्याची पावले केबिनकडे वळली, अगदी त्याच्याही नकळत.
त्याने केबिनचा दरवाजा उघडत विचारलं, मी आत येऊ का ?
तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. राजेश तसाच आत गेला. शलाका खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती.
राजेश तिच्याजवळ जाऊन उभा राहिला.
शलाकाने त्याच्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात पाणी होत. त्याने तिचे डोळे पुसले. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तिचा बांध फुटला. राजेशने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खूप वेळ दोघे काहीच न बोलता अश्रूंमधून स्वतःला मोकळं करत होते.
ती अलगद त्याच्या मिठीत विसावली , त्याने आपल्या बाहुपाशात तिला कैद केले, आणि त्यांना आपापल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
प्रेम हे फक्त प्रेम असते. त्याला ना जातीची सीमा ना गरीब श्रीमंतीची, ना पैसा , ना पोझिशन , ना पावर.
एकमेकांना हवी असणारी साथ लाभली की , काही कमी पडत नाही.
हवं असतं निस्सीम प्रेम आणि एकमेकांवरचा विश्वास. राजेशला शलाकाच खरं प्रेम कळलं म्हणूनच तो तिला भेटण्यासाठी ऑफिस मध्ये आला आणि तिचा होऊन गेला. ती मात्र त्याचीच होती , आधीपासून!
म्हणतात ना पारिजाताचा सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही !